महानगरी एक्सप्रेसमध्ये’ बॉम्ब ‘चा मेसेज ; रेल्वे स्थानकात हाय अलर्ट…

मुंबई : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याने महाराष्ट्र हाय अलर्टवर असतानाच आता महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ अशा दहशतवादी संघटनांचा उल्लेख करणारा मजकूर एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातील शौचालयात लिहिलेला एका प्रवाशाला दिसला. त्यानंतर त्याने तात्काळ ही माहिती गार्डला दिली.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. त्यानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनवर गाडी येताच या गाडीची रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. श्वानपथकाच्या माध्यमातून देखील संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली. मात्र गाडीमध्ये काही आढळून आले नसल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली असून संपूर्ण गाडीच्या तपासणीनंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.
दरम्यान अज्ञात व्यक्तीने महानगरी एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद.. ट्रेनमध्ये बॉम्ब आहे, असा संदेश लिहिला होता. एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना सांगितले. त्यानंतर जळगाव आणि भुसावळमध्ये एक्सप्रेसचा कसून तपास करण्यात आला. पण कोणतीही वस्तू आढळली नाही. रेल्वेकडून अफवांवर विश्वास ठेवू नका, असा मेसेज प्रवाशांना देण्यात आला आहे.या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश आढळून आल्याने रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
