पवारांना दणका; पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली ; ठाकरे गटाच्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये दिले असा आरोप उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली तर केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाला असेही दानवे यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकरणावर आता,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणासंदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्डस असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत. सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे, त्या आधारावर जे काय तुम्हाला सांगायच ते मी सांगणार आहे. अजून संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक दृष्ट्या जे मुद्दे समोर येतायत ते गंभीर आहेत. या प्रकरणी माहिती आल्यानंतरच शासनाची पुढची दिशा काय असेल? काय कारवाई करणार ते सांगू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भ्रष्टाचाराचे आरोप करुन सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे का? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. या संदर्भात उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालतील असं मला अजिबात वाटत नाही असं त्यांनी स्पष्ट सागितलं. आता याप्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
