पुण्यात रिक्षाचालक गणेश काळे प्रकरणातील महत्वाची माहिती समोर! ‘अल्पवयीन पॅटर्न’ पुन्हा चर्चेत, सुपारी दिली कोणी?


पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आणि आंदेकर टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कोंढव्यात रिक्षाचालक गणेश काळेचा खून करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गणेश काळेवर नऊ गोळ्या झाडून कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या भेटीतच गणेश काळेच्या हत्येची सुपारी फिक्स झाली होती का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा यावरही बोट ठेवले जात आहे.

काही दिवसांपूर्वी आंदेकर-कोमकर टोळी युद्धात गणेश काळेची हत्या झाली होती. मात्र तपासात असे दिसून आले आहे की, हत्येच्या काही दिवस आधीच कृष्णा आंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याचवेळी गणेश काळे प्रकरणातील आरोपींनी ससूनमध्येच आंदेकरशी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ससून रुग्णालयात कैद्यांना तपासणीसाठी आणताना संपूर्ण जबाबदारी पोलिसांवर असते. आरोपीवर नजर ठेवणे, तपासणी पूर्ण झाल्यानंतर तातडीने कारागृहात परत नेणे ही त्यांची जबाबदारी असते. मात्र या नियमांच्या धाब्यावर बसवून आरोपींना रुग्णालयातच बाहेरच्या व्यक्तींशी भेट घेऊ दिली गेली का, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या सध्या तुरुंग आणि रुग्णालयांच्या माध्यमातून बाहेरून सूचनांद्वारे व्यवहार करत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे या घटनेनंतर पुणे पोलिस प्रशासनावर मोठं दडपण आलं आहे.

गणेश काळे हत्येप्रकरणात अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल आणि मयूर दिगंबर वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकर, कृष्णा ऊर्फ कृष्णराज आंदेकर, स्वराज वाडेकर आणि आमीर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ होता. शनिवारी (ता.१) दुपारी बोपदेव घाट रस्त्याजवळ पेट्रोलपंपासमोर चार जणांनी त्याच्यावर नऊ गोळ्या झाडून कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!