ऐन दिवाळीत पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ : घरासह दुकानही फोडली, तब्बल 42 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : ऐन दिवाळीत शहरातील काही भागांमध्ये चोरट्यांनी घरफोड्यांचा धुमाकूळ घातला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि त्यानंतरच्या काही दिवसांत शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी घरासही दुकानं फोडली आहेत. त्याचबरोबर दागिने, रोकड आणि इतर ऐवज असा तब्बल 42 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुण्यातील नगर रस्ता, कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, हडपसर आणि बिबवेवाडी या भागांत चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून, पोलिसांनी संबंधित ठिकाणी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.यामध्ये सुरवातीला चोरीची घटना वाडेबोल्हाई परिसरातील एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घडली. यावेळी चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 19 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.दुसरी घटना कोथरूडमधील लोकमान्य कॉलनी परिसरात घडली. एका महिलेच्या सदनिकेतून 8 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. हडपसर भागातील अलकुंटे वस्ती परिसरात शुक्रवारी (23 ऑक्टोबर) एका महिलेकडून 9 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले. त्याचबरोबर बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी परिसरात असलेल्या प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 20 हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल फोन असा 2 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 80 हजार रुपयांची रोकड चोरी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान सणासुदीच्या काळात घरात महागडे दागिने किंवा रोकड ठेवू नये, तसेच प्रवासाच्या वेळी घर सुरक्षित ठेवावे. परिसरातील सीसीटीव्ही कार्यरत आहेत याची खात्री करावी, तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. सणाच्या दिवशी चोरी झाल्याने,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
