मराठा आंदोलक जरांगेच्या आंदोलनाचा फुसका बार ; कुणबी प्रमाणपत्रासाठी किती अर्ज आले? तायवाडेनीं दिला धक्कादायक आकडा…

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत केलेले आंदोलन यशस्वी ठरले असून त्यांच्या सहा मोठ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.ओबीसी नेते 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात रान पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जीआर ओबीसी प्रवर्गासाठी मृत्यूचा खलिता असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या नवीन दाव्याने या ओबीसी नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पण धक्का बसणार आहे. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यात किती अर्ज प्राप्त झाले आणि किती जणांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटण्यात आले याची धक्कादायक आकडेवारी तायवाडे यांनी समोर आणली आहे. त्यामुळे जरांगेंचे आंदोलन फुसका बार तर ठरले नाही अशी चर्चा होत आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ॲाक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 27 अर्जच मंजूर झाल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे. 2 तारखेच्या जीआरनंतर 35 दिवसांत मराठवाड्यात फक्त 27 अर्ज मान्य झाले. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा सरकारी पुरावाच तायवाडे यांनी सादर केला आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असते तर रांगा लागल्या असत्या, असे झणझणीत अंजन त्यांनी या मुद्दावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यांत घातले. ओबीसी नेत्यांनी अभ्यास करुन वक्तव्य करावे. बेजबाबदारपणे वक्तव्य करु नये. ओबीसी तरुणांनी केलेल्या आत्महत्यांसाठी आरक्षण संपलं म्हणणारे जबाबदार असल्याचा आरोप तायवाडे यांनी केला आहे. 2 तारखेच्या जीआर चा ओबीसींना धक्का लागणार नाही, आता तायवाडे यांचा दावा खरा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

