जुन्नर तालुक्यात काळुबाईच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, 13 जण जखमी


पुणे : दसरा तोंडावर असतानाच जुन्नर तालुक्यात शिंदळदरा येथे देवीच्या दर्शनावरून घरी निघालेल्या भाविकांना घेऊन चाललेली पिकअप उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर 13 जण जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, तळेरान (ता. जुन्नर) येथील काळूबाई देवीच्या दर्शनावरून परतत असताना शिंदळदरा येथे पिकअप वळणावर आली असता अरुंद रस्ता आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ओल्या गवतावरून ती घसरल्याची माहिती समोर आली आहे. ती रस्त्यावरील वळणावर रस्त्याच्या १० ते १५ फूट खाली जाऊन उलटली. यात १३ ते १५ जण जखमी झाले. बगाडवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी लगेचच घटनास्थळी येऊन जखमींना बाहेर काढले. यापैकी १३ जखमींवर आळेफाटा येथील सोनवणे रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघातात कविता विठ्ठल गवारी (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाला असून, चार ते पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान या अपघातात गोदाबाई भालचिम (वय ५०), वैष्णवी गवारी (वय १८), अमिता लोहकरे (वय २५), वैशाली गवारी (वय ४८), लक्ष्मी भालचिम (वय ३०), झुंबरबाई लोहकरे (वय ५५), जिजाबाई भालचिम (वय ४५), हर्षल भालचिम (वय ५) यांच्यासह दीक्षा लोहकरे, ईश्वरी भालचिम, सोनाली भालचिम, नंदाबाई भवारी आणि समीर लोहकरे जखमी झाले आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!