‘आझाद मैदान आउट’? दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पर्यायी जागेची चाचपणी, कारण काय?

मुंबई: दसरा मेळाव्यात प्रत्येक राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत असतात. यंदाही ठाकरेचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क येथे पार पडत असताना दुसरीकडे शिंदे गटानेही आपल्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान निश्चित केले आहे. मात्र पावसामुळे यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी ठाकरे आणि शिंदे गटानेही जोरदार तयारी केली आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावर यंदा पावसाचे सावट आले आहे. दरवर्षीप्रमाणे आझाद मैदानात हा मेळावा घेण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पक्षाने पर्यायी बंदिस्त स्थळांची चाचपणी सुरू केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,यासाठी वरळी डोम, गोरेगाव नेस्को आणि आणखी एका बंदिस्त स्थळाचा पर्यायी पर्याय म्हणून कोअर कमिटी स्तरावर विचार सुरू आहे. पावसामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवसैनिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी ही तातडीची हालचाल करण्यात येत आहे.
दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे पूरजन्य परिस्थिती असल्याने, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांचा मेळाव्यात सहभाग मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्याची प्रमुख जबाबदारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसैनिकांवर सोपवण्यात आली आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
