खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या ; दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी..

पुणे : निलंबित IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या कुटुंबियांचे कारनामे काही केल्या कमी होत नाहीत. आधी बनावट कागदपत्र, नंतर मुळशी तालुक्यातील जमिनीच्या वादातून बंदूक काढून धमकावल्याचे प्रकरण त्यानंतर आता ऐरोली परिसरात घडलेला अपघातानंतर आता खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे.आता गेल्या काही दिवसापासून फरार असलेले दिलीप आणि मनोरमा खेडकर दोघेही अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा परदेशी पलायनाचा संशय लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

काय आहे प्रकरण?
ऐरोली परिसरात दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर कारची एका ट्रान्झिट मिक्सर ट्रकशी किरकोळ धडक झाली. अपघातानंतर खेडकर यांनी ट्रकचा सहाय्यक प्रल्हाद चौहान (वय 22) याला जबरदस्तीने गाडीत बसवून पुण्यातील त्यांच्या बंगल्यावर नेले. तेथे चौहानला एका खोलीत बंदिस्त करून त्याच्यावर शारीरिक छळ करण्यात आला, तसेच अन्न म्हणून शिळे अन्न दिल्याची देखील माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी रविवारी 14 सप्टेंबर रोजी पुण्यातील खेडकर यांच्या बंगल्यावर छापा टाकला. मात्र, त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी वाद घालत पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघेही घर सोडून फरार झाले. फरारी होण्यापूर्वी त्यांनी गुन्ह्याशी संबंधित लँड क्रूझर कार आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर गायब करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे याला अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी दिलीप आणि मनोरमा खेडकर फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना झाली असून, त्यांना परदेशात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे.