मोठी बातमी! भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस होणार? दिल्लीत हालचालीनां वेग..

पुणे : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवरून दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेतृत्त्वाकडून लवकरच कायमचे दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर रिक्त असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला होता. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं आणि संघटनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी जाहीररीत्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. मात्र, सध्या तुम्ही काम सुरू ठेवा, काही दिवसांनी याबाबत आपण निर्णय घेऊ, असा निरोप मंत्री अमित शाह यांच्याकडून देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांची अनेकदा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत खलबते झाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या सगळ्या भेटीगाठींनंतर झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांना आता राज्यातून देशपातळीवर काम करण्याची संधी देण्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोणाकडे सोपवली जाणार हा प्रश्न देखील समोर आहे. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा आणि ताकद असल्याने ते मोक्याच्या क्षणी दिल्लीत गेल्यास त्यांचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच सध्याच्या घडीला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य चेहरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातही उत्तम संबंध आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण चेहऱ्यासाठी आग्रही आहे. या शर्यतीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचचं नाव आघाडीवर आहे.