‘यशवंत’च्या जमीन विक्रीला पर्याय नसल्यानेच पुणे बाजार समितीशी व्यवहार! विक्री व्यवहारात एक रुपयाची गडबड होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार थेऊरफाट्यावर वक्तव्य…

उरुळीकांचन : गेली अनेक वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याची जमीन विक्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कारखान्याची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यासाठी मंत्री मंडळाने परवानगी दिली आहे. हा जमिनीचा व्यवहार पारदर्शक होणार असून पैशांची देवघेव चेकद्वारे होणार आहे. त्यामुळे यशवंत जमीन विक्री व्यवहारात एक रुपयाची सुद्धा गडबड होणार नाही अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

कुंजीरवाडी, थेऊर फाटा (ता. हवेली) येथील श्रीनाथ सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे, शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, माजी सरपंच सचिन तुपे, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी आंबेकर, संचालिका सुनिता धुमाळ, वैशाली मेमाणे, ज्ञानेश्वर धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाढवे, महादेव धुमाळ, राहुल धुमाळ, अजय कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, पोपट चौधरी, विश्वनाथ रुपनर, उमेश राखपसरे, राजेंद्र गायकवाड, व्यवस्थापक शिवाजी जावळे, गजानन सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन संदीप धुमाळ यांनी श्रीनाथ पतसंस्था उभारली आहे. या पतसंस्थेने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबवून मागील २५ वर्षापासून प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांचे काम खरंच कौतुकास्पद आहे. या संस्थेने सहकाराच्या तत्वावर ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांना सक्षम करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थेने शेतकरी व छोट्या व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले आहे. हवेली तालुक्याच्या विकासासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. सहकार, विश्वास व पारदर्शकतेच्या बळावर ही पतसंस्था उभी राहिली आहे. आज या संस्थेच्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. दुष्काळ, करोनाच्या महामारीत आर्थिक मंदी असताना देखील पतसंस्थेने चांगले काम केले आहे.

यावेळी बोलताना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ म्हणाले इवलेसे रोपटे लावलेल्या श्रीनाथ पतसंस्थेचा वेलू गेला गगणावरी गेला आहे. संस्था स्थापन केल्यापासून संस्थेच्या उभारणी मध्ये आणि प्रगतीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. सुरवातीला २२१ सभासद, २१ हजार रुपये भाग भांडवल आणि १ लाखांच्या ठेवी होत्या. आज दोन शाखा, ४१ कोटींच्या ठेवी, ३५ कोटींचे कर्ज वाटप, ६२ कोटींचे खेळते भांडवल आणि स्वमालकीच्या दोन इमारती आहेत. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली हि संस्था पंचक्रोशीची अर्थ वाहिनी ठरली आहे असे मत संदीप धुमाळ यांनी व्यक्त केले.
पुरंदर विमानतळ तीन वर्षात होणार..
एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर काही जण नाराज होतात. परंतु विकासासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. कुणीतरी जमीन दिली म्हणून खडकवासला परिसरात धरणं तयार झाली. त्याचे पाणी आपण सर्वजण पीत आहोत. पुरंदर येथे भारतातील दोन नंबरचे सर्वात मोठे विमानतळ बांधण्यात येणार आहे. हे विमानतळ ३ वर्षात तयार होणार आहे. त्यानंतर पुरंदर विमानतळ ते लोणावळ्या पर्यंत मेट्रो नेण्यात येणार आहे.