मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले बोरी बु या गावाचे विशेष कौतुक! पुण्यात आवर्जून प्रत्याक्षिकाला भेट! राज्यभर रो – मॉडेल म्हणून प्रयोग विकसित करण्याचा सूचना…

उरुळीकांचन : राज्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांची मूळ समस्या असलेल्या शेतरस्त्यांचा मुख्य अधिकार शेतकऱ्यांना प्राप्त व्हावा या उद्देशाने राज्यात महसूल व वन विभागाने राज्यात प्रभावीपणे राबविलेल्या शिवरस्ते,पाणंद रस्ते, शिवार रस्ते खुले करण्याचा शासन धोरण अवलंबिले आहे. या अभियानात बोरी बु (ता.जुन्नर) या गावाने या अभियानांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून राज्यात एक रो मॉडेल म्हणून विकसित झालेल्या बोरी बु गावच्या प्रात्यक्षिकाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जून भेट देऊन माहिती जाणून
लोकसहभागातून केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.

जुन्नर तालुक्यातील बोरी बु हे शेतरस्त्यांची थेट अभिलेखातनोंद होऊन शेतकऱ्यांना रस्त्यांना कायदेशीर अधिकार मिळाला म्हणून अव्वल ठरले आहे. ग्रामस्थ व महसूल अधिकारी यांच्या लोकसहभागातून ग्रामीण भागाच्या व्यवस्थेचे एक आदर्श उदाहरण यानिमित्ताने पुढे आले आहे. जुन्नरचे तहसीलदार डॉ. सुनिल शेळके यांच्या मूळ अभिमानाच्या संकल्पनेतून बोरी बु ग्रामस्थांनी पाणंद,शिव व शिवार रस्त्यांची मूळ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 29 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या शेत रस्ते खुले करण्याच्या धोरणातून बोरी बु गावाने सहभाग घेत रस्त्यांच्या सिमा खुल्या करुन रस्त्यांची मोजणी व भू-सांकेतिक क्रमांक देऊन रस्त्यांची नोंद भूअभिलेखात करुन घेतली आहे. ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून पूर्वी अस्तित्वात असलेले ५ रस्ते व नव्याने निश्चित झालेले ६९ पाणंद, शेतरस्ते, शिवरस्ते आणि वहिवाटीचे रस्ते यांना खुले करुन तब्बल ७४ रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देण्याची किमया साधली आहे. त्यामुळे बोरी बु हे राज्यातील रस्त्यांना सांकेतांक देवून जीआयएस नकाशावर स्थान देणारे पहिले गाव ठरले आहे.

या अभियानाची राज्यभर चर्चा झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार (दि.१७) रोजी पुण्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ व ‘सेवा पंधरावडा’या कार्यक्रमास गणेश कला क्रिडा मंच येथे आले असता महसूल व भू अभिलेख विभागाने मांडलेल्या प्रात्यक्षिकाच्या प्रदर्शनावरआवर्जूनभेट दिली. या भेटीत त्यांनी बोरी बु गावात राबविलेल्या अभियानाची डॉ. सुनिल शेळके यांच्याकडून माहिती घेतली व त्यांच्या अभियानाचे कौतुक केले. हे अभियान राज्यात मूळ रो मॉडेल म्हणून कौतुक केले. या अभियानाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी करून राज्यभर हे अभियान
राबविण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच महसूल विभागाने विकसित केलेल्या नोंद वहित मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हस्ताक्षर करुन प्रशंसा केली आहे.
अशी केली जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंदणी…
ग्रामसभेत मंजूर रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन उपधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात माहिती देऊन त्यानंतर जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर अक्षांश-रेखांशासह नोंदणी करण्यात येते. परिणामी गावनिहाय नमुना 1 (फ) मध्ये रस्त्यांना अधिकृत व कायदेशीर अभिलेख प्राप्त होईल.