बुलढाण्यात भीषण अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; चौघांचा जागीच मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रेलरचा जोरदार अपघात झाला आहे.या अपघातामध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये कार चालकाचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रेलरच्या झालेल्या भीषण अपघातात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार ट्रेलरला जाऊन जोरदार धडकली.मुक्ताईनगरकडून मलकापूरच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.कारचालक साजिद अजीज बागवान यांच्यासह ३ महिला असे एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला. ३ मृत महिलांची अजूनही ओळख पटू शकली नाही.
दरम्यान अपघातामध्ये गंभीर जखमींमध्ये संतोष तेजराव महाले (वय ४० वर्षे. राहणार चिखली तालुका मुक्ताईनगर), , पंकज दिलीप गोपाळ (वय २२ वर्षे. राहणार नांद्रा हवेली, तालुका जामनेर), दिपीका विश्वास (वय ३० वर्षे, राहणार कोलकाता पश्चिम बंगाल), टीना अजय पाटील (वय ४५ वर्षे राहणार भुसावळ) यांचा समावेश आहे. एका जखमी महिलेची ओळख अद्याप पटली नाही. जखमींवर उपचार सुरू असून यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यावरून वाहनचालक आरोपी साजिद अजीज बागवान विरोधात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.