अत्याचार प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्याची पुन्हा ‘स्वारगेट’लाच नेमणूक; परिवहनमंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना झापले..

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर त्यांची पुन्हा स्वारगेट आगारातच नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी अधिकाऱ्यांना झापले.

सरनाईक म्हणाले, स्वारगेट बसस्थानकावर फेब्रुवारी २०२५ घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरून गेले होते. अशा वेळी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक व दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः केले. त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रादेशिक व्यवस्थापकांनी त्यांच्या बदल्या न करता तेथेच त्यांची नियुक्ती केली. त्यामुळे दोषींना आपण पाठीशी घालतोय, असा संदेश समाजात गेला.
याप्रकरणी आता संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, निलंबनानंतर स्वारगेट बसस्थानकावरच नियुक्ती दिलेल्या अधिकारी व पर्यवेक्षकांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहे अस त्यांनी म्हटलं आहे.स्वारगेट आगारातील काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत तक्रारी केल्या तसेच या ठिकाणी गैरप्रकार सुरू असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
