भारत-पाकिस्तान सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ ; पुण्यातील शहिदांच्या कुटुंबियांची संतापजनक प्रतिक्रिया


पुणे : भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या साड्याने लाल झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 भारतीयांचा बळी गेला. या घटनेत पुण्यातील दोन कुटुंबांचे सदस्यही शहीद झाले. गणबोटे आणि जगदाळे कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमवावा लागला. देशभरात या घटनेचे दुःख अद्यापही ओसरलेले नाही. अशा परिस्थितीत आज होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर तीव्र टीकेचा विषय ठरला आहे. आता या सामन्यावरून शहिदांच्या कुटुंबीयांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे यांनी या संदर्भात संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, या घटनेने आमच्या भावना अजून सावरलेल्या नाहीत.पाकिस्तानचे दहशतवादी आमच्या जवानांना, आमच्या नागरिकांना मारून टाकतात आणि त्याच देशाच्या खेळाडूंशी आपण मैदानात सामना खेळतो, हे आमच्यासाठी दु:खदायक आहे. हा सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सहा महिनेही झाले नाहीत या हल्ल्याला, तरीही पाकिस्तानसोबत सामना खेळला जात आहे. ज्यांना भावना नाहीत तेच असे निर्णय घेतात. बीसीसीआयने किमान हा सामना रद्द करायला हवा होता, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शहीद जवानांच्या बलिदानाची वेदना अजूनही ताज्या असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे योग्य आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांपासून ते शहीदांच्या नातेवाईकांपर्यंत सर्वत्र विचारला जात आहे.

देशासाठी प्राण देणाऱ्यांचा सन्मान करताना किमान अशा सामन्यांवर निर्णय घेताना संवेदनशीलता दाखवली गेली असती तर शहीद कुटुंबीयांच्या जखमा आणखी खोल झाल्या नसत्या, असा सूर शहिदांच्या कुटुंबीयांकडून उमटला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!