मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकार अॅक्शन मोडमध्ये, घडामोडींना वेग, उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक थोड्याच वेळात…

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून (ता. २९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे. मनोज जरांगेंसह लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.

तसेच सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, काही अटींअंती याला एक दिवसाची परवानगी मिळाली आणि नंतर ती मुदत आणखी एक दिवस वाढवण्यात आली. दरम्यान, मराठा समाज आक्रमक भूमिकेत असून, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अॅक्शन मोडमध्ये जात महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात मुंबईतील रॉयल स्टोन बंगल्यावर होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य दादा भुसे, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे यांच्यासह काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके हे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या बैठकीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या बैठकीनंतर समिती सदस्य आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.