मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून मोठा इशारा; म्हणाले, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लढ्याचा बिगुल वाजवत मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईत दाखल झाले. तब्बल 48 तासांच्या अखंड प्रवासानंतर हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी आझाद मैदानात पाऊल ठेवले.

सकाळी दहाच्या सुमारास तेथे दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी मंचावरून उपस्थितांना संबोधित केले. या क्षणाने संपूर्ण आझाद मैदान घोषणाबाजीने दणाणून गेले.
मंचावरून बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, सरकारने गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे. मी मरण पत्करायला तयार आहे पण मागे हटणार नाही. असं म्हणत त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाची सुरुवात केली. समाजाच्या न्यायासाठी सुरू झालेल्या या लढ्यात कुठलाही गोंधळ न करता शांततेने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांना एकच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोर्टाने परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी २० अटी घालून या उपोषणाला परवानगी दिली आहे. मात्र, आजसाठीच ही परवानगी असणार आहे.
दरम्यान, आझाद मैदानावर सुरू झालेले हे उपोषण राज्याच्या राजकारणात मोठा कलाटणीबिंदू ठरण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हक्कासाठी आपलं जीवन पणाला लावलं असून या आंदोलनाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे.