देशभरात अलर्ट, पाकिस्तानातून तीन दहशतवादी नेपाळ मार्गे भारतात, मोठ्या हल्ल्याची भीती..

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे तीन आतंकवादी नेपाळ मार्गे भारतात घुसले आहेत. बिहार पोलिस मुख्यालयाने या तिन्ही दशतवाद्यांची फोटो आणि नाव जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील बहावलपुरचा रहिवासी मोहम्मद उस्मान, उमरकोटचा रहिवासी आदिल हुसैन, रावलपिंडीचा रहिवासी हसनैन अली अवान अशी तिघांची नावे आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे तिघेही काठमांडू पोहोचले होते. त्यानंतर ते बिहार मार्गे भारतात घुसले आहेत.
या तिघांचा फोटो आणि ओळख पटवणारी माहिती बिहार पोलिस मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण आणि महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेले गणेशोत्सवाचे दिवस लक्षात घेता त्यांच्या हालचाली चिंताजनक ठरत आहेत.या तिघा दहशतवाद्यांचा फोटो व्हायरल करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठेही हे दिसल्यास तातडीने संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. सध्या बिहारसह देशातील विविध भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. तपास यंत्रणांचे लक्ष या तिघांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यावर केंद्रीत आहे.
पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून भरायच्या आहेत. त्यातच पुन्हा पाकिस्तानातून दहशतवादी घुसल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पहलगाम हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता.