पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ‘महायुती ‘समोर युतीचा पेच ; काका -पुतणे एकत्र येणार?

पुणे : आगामी होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असताना या निवडणुकीत
पुण्यातील बहुतांश प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातील संघर्ष हा चर्चेचा विषय ठरणार आहे. त्यामुळे ‘महायुती’ पुढे येत्या काळात ‘युती’ करण्याचा पेच कायम राहणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपचा मतदार एकसंघ राहिला असला तरी ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेनेच्या मतदारांत फूट पडली आहे. पुण्यात भाजपने स्वबळाचा नारा दिल्यास दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येऊन भाजपला आव्हान देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे महापालिकेत सन २०१७च्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता होती. महापालिकेतील १६२ पैकी ९७ नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दोनने वाढ होऊन भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ९९ झाली. भाजपचे ४१ प्रभागांपैकी १५ प्रभागांमध्ये चारही सदस्य निवडून आले होते. तर, सात प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन असे २१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या विजयाचे गणित २२ प्रभागांमध्ये दडलेले होते. या २२ प्रभागांमधूनच ८१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे ४१ प्रभागांपैकी ३४ प्रभागांमध्ये किमान एक तरी नगरसेवक निवडून आला होता. तर, उर्वरित सात प्रभागांमध्ये विरोधकांची ताकद दिसली होती. महापालिकेची नव्याने प्रारूप प्रभागरचना करताना विरोधी नगरसेवकांचे प्राबल्य असलेल्या सात प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.
दरम्यान भाजप-‘राष्ट्रवादी’ ची युती झाली तर या दोन्ही पक्षांतील मातब्बर बंडखोरांना महाविकास आघाडीची दारे उघडी असणार आहेत. त्यामुळे ‘महायुती’ पुढे आगामी काळात युती करायची की नाही, याचा पेच कायम राहणार आहे.
