फडणवीस सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा…मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, मुंबईकडे येण्याचा मार्ग ठरला

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मात्र सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आंतरवाली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी स्पष्ट केलं की, येत्या २९ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. त्यासाठी २७ ऑगस्टपासून त्यांच्या मोर्चाची सुरुवात होईल. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवालीहून मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा मंकाळा, शहागड, आंबळटाकळी, तुळजापूर, वाघाडी, पैठण मार्गे जाईल. त्यानंतर २७ ऑगस्टला शिवनेरी मुक्कामी राहणार आहे.

दरम्यान, २८ ऑगस्टला शिवनेरीचे दर्शन घेऊन मोर्चा राजगुरु नगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचेल. त्याच दिवशी संध्याकाळी आझाद मैदान गाठलं जाईल आणि २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू होईल. “मुलांचे हाल होता कामा नयेत. कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून आम्ही चाकण मार्ग निवडला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या..
मराठा आणि कुणबी समाजावरील जीआर मंजूर करून तो लागू करावा. हैदराबाद गॅझेट तातडीने अंमलात आणावा. गेल्या १३ महिन्यांपासून सुरू असलेला ‘अभ्यास’ हा केवळ वेळकाढूपणा असून तो आम्हाला मान्य नाही. समाजाच्या नोंदी उपलब्ध असतील तर त्या त्वरित आम्हाला द्याव्यात. आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही न्याय मिळेपर्यंत उपोषण थांबवणार नाही, असा ठाम पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला आहे.