सिंहगडावरून बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला, सीसीटीव्हीच्या मदतीने झाला मोठा उलगडा, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावरून पाच दिवसांपूर्वी साताऱ्यातील एक तरुण गायब झाला होता. पाच दिवस पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागत नव्हतं.

अशातच आता तब्बल पाच दिवसानंतर गायब झालेल्या गौतमचा शोध लागला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे पोलिसांनी CCTV मार्फत गौतमला शोधल्याची माहिती मिळत आहे. २४ वर्षीय गौतम गायकवाड हा मूळ फलटण (जि. सातारा)चा असून सध्या हैदराबादमध्ये राहत होता. तो आपल्या मित्रांसोबत – महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी – सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता.
बुधवारी दुपारी ४:३० वाजता ही मंडळी किल्ल्यावर पोहोचली. सायंकाळी तानाजी कड्याजवळ पोहोचल्यावर गौतमने ‘लघुशंका करून येतो’ असं सांगून तो दूर गेला. मात्र, त्यानंतर तो परत आला नाही.या शोधमोहीमेत एक मोठा पेच सीसीटीव्ही फुटेजमुळे निर्माण झाला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कॅमेऱ्यात गौतम पळताना आणि लपतानाही दिसला होता.

त्यामुळे तो दरीत पडला नव्हता, हे स्पष्ट झालं. पण मग तो नेमका कुठे गेला होता आणि का गायब झाला होता, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या घटनेत त्याने मुद्दाम अशी कृती केली का, हा संशय पोलिसांना येऊ लागला आहे. सध्या गौतम रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची तब्येत स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले आहे. मात्र, त्याच्या गायब होण्यामागील खरी कारणे अद्याप अस्पष्ट आहेत.
मित्रांच्या जबाबात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये विसंगती असल्यामुळे पोलिसांना संशय आहे की, ही घटना केवळ अपघात नसून दुसरे काही कारण असू शकते. गौतमकडून जबाब नोंदवल्यानंतरच प्रकरणातील गूढ उलगडेल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत सिंहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.