द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिसंवाद व ६५ वे वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कायम सकारात्मक असेल, शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ आहे असं प्रतिपादन केलं.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, द्राक्ष बागाईतदार संघाच्या अध्यक्षांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेवून त्यावर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ. केंद्रीय स्तरावरील मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन दिल्लीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्यात येईल. मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अडचण येणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.
द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने भोसले यांनी केलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रातील मागण्या आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करू. देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे; शेतकऱ्यांनी या बाजारावरही लक्ष द्यावे. आपण उत्पादीत केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठ कशी निर्माण करू शकतो याबाबत काम सुरू आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, संघाला योग्य ठिकाणी, योग्य तेवढा निधी देण्यासाठी प्रयत्न करू. ड्रोन फवारणीसाठी राज्य शासन अनुदान देत असून, यात महिला बचतगटांना प्राधान्याने संधी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे असं त्यांनी म्हटलं.दरम्यान उपमुख्यमंत्री शपवार यांच्याहस्ते कृषिभूषण सुरेश एकनाथ कळमकर, द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी (चिली) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘द्राक्ष वृत्त’ या स्मरणिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील विविध कंपन्यांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. या कार्यक्रमाला द्राक्ष बागायत संघाचे आजी-माजी पदाधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राज्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या सेख्येने उपस्थित होते.हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, वाकड, पुणे येथे आयोजित कार्यक्रमास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकरराव मांडेकर, केंद्रीय फलोत्पादन उपसचिव संजय सिंह, कृषी आयुक्त हेमंत वसेकर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, पुणे एनआरसीजीचे संचालक कौशिक बॅनर्जी, चिली देशाचे द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी, संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन आदी उपस्थित होते.