कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाला मोठा धक्का! कुलगुरू हरेराम त्रिपाठी व पत्नींचे अपघाती निधन, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त…


नागपूर : येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठीजी आणि त्यांच्या सहचारिणी यांचा आज पहाटे उत्तरप्रदेशात एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. याबाबत हळहळ व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

याबाबत ते म्हणाले, ही घटना ऐकून अतिशय वाईट वाटले. केवळ कुलगुरू नाही, तर भारतीय दर्शन आणि न्यायशास्त्रातील विद्वान म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अनेक विषयांवर संशोधन करताना त्यांनी 40 हून अधिक पुस्तके लिहिली होती. महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार, पाणिनी सम्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

संस्कृतच्या सेवेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. याच महिन्यारंभी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र होतो. आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले, यावर विश्वासच बसत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्रिपाठी कुटुंबियांच्या आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांचा संस्कृतचा व्यासंग विलक्षण आणि स्तिमित करणारा होता. तसेच ते न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वानसुद्धा होते. उत्कृष्ट अध्यापन शैलीमुळे ते विद्यार्थीप्रिय होते.

त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राबरोबरच संस्कृत भाषेचेही अपरिमित नुकसान झाले आहे. या दाम्पत्याच्या निधनाने त्रिपाठी कुटुंबीय आणि हजारोच्या संख्येने असलेले त्यांचे विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!