बिग बॉसच्या इतिहासातील सर्वांत महागडी स्पर्धक! मानधनाचा आकडा इतका मोठा की तोडले सगळे रेकॉर्ड…

मुंबई : सलमान खानचा सर्वांत लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ एका नव्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस’चा हा एकोणिसावा सिझन आहे. त्यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही स्पर्धकांची नावंही चर्चेत आली आहेत.

तर कोणाला किती मानधन मिळालंय, हे जाणून घेण्यासाठीही चाहते आतूर असतात. बिग बॉसच्या स्पर्धकांच्या मानधनाचा उल्लेख अनेकदा चाहत्यांमध्ये होत असतो. टेलिव्हिजनवरील हा सर्वांत लोकप्रिय शो असल्याने दर आठवड्याला स्पर्धकांना चांगली रक्कम मिळते. त्या त्या स्पर्धकाच्या लोकप्रियतेनुसार ही फी ठरवली जाते. ‘बिग बॉस’च्या इतिहासात अशाच एका स्पर्धकाने भरभक्कम मानधन स्वीकारलं होतं.
या शोच्या चौथ्या सिझनमध्ये एक हॉलिवूड अभिनेत्रीने एंट्री घेतली होती. विशेष म्हणजे ती फक्त तीन दिवस बिग बॉसच्या घरात थांबली आणि या तीन दिवसांसाठी तिला तब्बल 2.5 कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं. ही रक्कम बिग बॉसच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसापेक्षा देखील कितीतरी पटीने जास्त होती.

बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन सहभागी झाली होती. तिच्या आगमनाने शोला वेगळंच ग्लॅमर मिळालं आणि चर्चांचा विषय ठरला. पामेला घरात फक्त तीनच दिवस राहिली, पण तिच्या उपस्थितीमुळे सिझनची लोकप्रियता प्रचंड वाढली.

त्या काळात बिग बॉसच्या विजेत्याला फक्त 50 लाख रुपयांचं बक्षीस मिळत होतं. काही सिझन्समध्ये ही रक्कम एक कोटीपर्यंत वाढली. मात्र, पामेलाला तीन दिवसांसाठीच 2.5 कोटी रुपये देण्यात आले. हे मानधन ऐकूनच प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होते.
दरम्यान, ‘बिग बॉस 4’ हा सिझन अनेक कारणांमुळे लक्षवेधी ठरला. यात पामेला अँडरसनसोबतच अभिनेत्री श्वेता तिवारी, अश्मित पटेल, डॉली बिंद्रा आणि ग्रेट खली यांसारखे स्पर्धक होते. शेवटी श्वेता तिवारीने विजेतेपद पटकावलं. पण पामेलाच्या एंट्रीमुळे शोला वेगळीच चमक मिळाली.