सरकारचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या सर्व खाजगी अन एसटी बसेसना टोलमाफी

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखात्यातील रस्त्यावरील टोलनाक्यावर टोल माफी जाहीर केली आहे.त्यामुळे आता गावाकडे जाणाऱ्या कोकणवासीयांचे टोलमुळे हजार रुपये वाचणार आहेत.

खासगी वाहनांतून प्रवास करताना कोकणवासींयाचे टोलमुळे हजारो रुपये जातात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाआहे. सरकारने गणेशोत्सवाच्या काळात टोलमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील.
दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
