राज्यात पावसाचा हाहाकार! सातारा जिल्ह्यात मोठी पूरस्थिती, 350 नागरिकांचे स्थलांतर, यंत्रणा अलर्ट मोडवर…


पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत२१ जणांचा मृत्यू झालाय १० जण जखमी आहेत. १४ लाख एकर शेती पाण्याखाली गेलीय. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत पथक आणि तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्यात.

सातारा घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा आणि उरमोडी नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

परिणामी सातारा, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यातील ३५० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोयना धरण जलदगतीने भरल्याने सर्व दरवाजे १३ फूटांनी उघडण्यात आले असून तब्बल ९५ हजार ३०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण १०२ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे तांबवे आणि निसरे येथील बंधारे तसेच संगमनगर धक्का पूल आणि मुळगाव पूल पाण्याखाली गेले आहेत.

इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे..

कण्हेर धरण – 14,876 क्यूसेक, उरमोडी धरण – 8,900 क्यूसेक, वीर धरण – 55,800 क्यूसेक, धोम धरण – 17,000 क्यूसेक.. यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पाटण तालुक्यातील 53 कुटुंबांतील 253 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. गुहागरमधील 150 प्रवासी अडकले होते, त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. कराड-चिपळूण मार्ग पाण्यामुळे बंद करण्यात आला आहे. कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिरात पाणी घुसलं आहे.

दरम्यान, प्रशासनाने इशारा दिला आहे की, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाटण, कराड आणि सांगली जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि नदीकाठापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!