मुसळधार पावसामुळे शेतकरी अक्षरशः भुईसपाट, राज्यात 5.50 लाख हेक्टर पिकांना पावसाचा फटका…


पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.

या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ५ लाख ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, यामध्ये नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या एकाच जिल्ह्यात 2 लाख 60 हजार हेक्टरवरील पिके खराब झाली आहेत. कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी, हळद, मका यासह कांदा, भाजीपाला आणि फळपिकांनाही या पावसाने झोडपले आहे.

सध्या पाऊस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश क्षेत्रीय स्तरावर देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), रफिक नाईकवाडी यांनी दिली.

जिल्हानिहाय पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये)

नांदेड: 2,59,789, यवतमाळ: 80,969, अकोला: 43,702, सोलापूर: 41,772, हिंगोली: 40,000, धाराशिव: 28,500, परभणी: 14,000, जळगाव: 12,327, अमरावती: 12,361, बुलढाणा: 10,702, जालना: 2,146, छत्रपती संभाजीनगर: 2,074, बीड: 930, वर्धा: 776, धुळे: 23, लातूर: 10, अहमदनगर: 3

दरम्यान, या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी, भात शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो, असे कृषी विभागाने म्हटले आहे. पुढील काही दिवस पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!