मोठी बातमी! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा…

पुणे : आज ७९ वा स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्त्वपूर्ण भाषण दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. शेतकऱ्यांना आता ५ वर्षांसाठी मोफत वीज दिली जात आहे. तसेच, दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’ सुरू आहे, जो डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास हरित वीज मिळेल. नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना ‘ऑपरेशन सिंदूर’चे विशेष कौतुक केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लक्ष्यांना उद्ध्वस्त करून भारताची ताकद जगाला दाखवून दिली. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि सैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले.तसेच स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्यात येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या योगदानाचा गौरव केला.
आपल्या देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी ४०% गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. तसेच, वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. उत्तम शिक्षण आणि मानव संसाधन विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
