पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची ‘हप्तेखोरी’ चव्हाट्यावर ; कारवाईच्या धाकाने 10 हजार उकळले…

पुणे : पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने तब्बल दहा हजार उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक हॉटेलमध्ये शिरून रात्री सव्वा बारा वाजताच हॉटेल बंद करण्यास सांगत असलेले आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. तसेच त्यांनी दुसर्या दिवशी हॉटेल मॅनेजर आणि मालकाला देखील फोन केल्याचे समोर आले आहे. तसेच तुम्ही जर माझं काम केलं तर मी तुमचं काम करतो नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी दमबाजी खराडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाने केली. तसेच कारवाई करण्याचा धाक दाखवून त्यांनी हॉटेल व्यवसायिकाकडून दहा हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान या सर्व प्रकरणानंतर आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांकडून जर नियमांचे उल्लंघन होत असलेल तर त्यांच्यावर कारवाई होणे जरजेचेच आहे. परंतू केवळ कारवाई करण्याच्या धाकाने जर काही पोलिस अधिकारी आपले आर्थिक हेतू साध्य करून पाहत असतील तर हे नक्कीच पोलिसांच्या प्रतिमेला शोभणारे नसल्याचे बोलले जात आहे.
