ना रस्ता, ना पूल… सातपुड्यात ‘झोळी’च बनली रुग्णवाहिका! २३ वर्षीय रुसाबाईंचा उपचाराआधीच मृत्यू; विकासाच्या दाव्यांवर संतापाचा पूर


अक्कलकुवा : स्वातंत्र्याला अनेक दशके उलटूनही सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी जीवाशी संघर्ष करावा लागत असल्याचे अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समोर आले आहे. गावाला पक्का रस्ता नाही, सुक नदीवर पूल नाही आणि रुग्णवाहिकेलाही गावापर्यंत पोहोचता येत नाही. या परिस्थितीत गंभीर अवस्थेतील २३ वर्षीय विवाहितेला ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या झोळीतून रुग्णालयाकडे नेले; मात्र उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

वेहगी बारीपाडा येथील रुसाबाई सुभाष वळवी (वय २३) यांना शुक्रवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक छाती आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले; मात्र गावाची भौगोलिक परिस्थितीच मोठा अडथळा ठरली. गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने तसेच उपनदी सुक नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थेट गावात पोहोचू शकली नाही.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या साहाय्याने झोळी तयार केली. रुसाबाईंना त्यात ठेवून पिंपळखुंटा येथील रुग्णालयाच्या दिशेने पायपीट सुरू करण्यात आली. मात्र दुर्गम वाट, नदी आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतानाही वेळ जात राहिला. अखेर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुसाबाईंची प्राणज्योत मालवली.

रुसाबाईंचे माहेर वेहगी बारीपाडा येथे असून सासर ओहवा येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच त्या पतीसोबत माहेरी आल्या होत्या. त्यांना सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

दोन हजारांहून अधिक नागरिकांची रोजची ‘अग्निपरीक्षा’

सातपुड्यातील अनेक गावांमध्ये आजही सर्वकालीन रस्ते, नदीवरील पूल, फरशी किंवा साकव नसल्याने पावसाळ्यात संपर्क व्यवस्था कोलमडते. अत्यवस्थ रुग्णांसह गर्भवती महिला, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांना नदी-नाले ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे रुसाबाईंच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचे दुःख समोर आले नसून, संपूर्ण परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वेहगी येथील ग्रामस्थ दिलीप जयसिंग पाडवी यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रत्येक निवडणुकीत रस्ता आणि पूल बांधण्याची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती कायम असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या मागणीसाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

“आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का? सुविधा मागणे हा आमचा अधिकार नाही का? रस्ता-पुलाअभावी आणखी किती जीव जाणार?” असा सवाल करत पाडवी यांनी शासन-प्रशासनाने तातडीने रस्ता व पूल उभारून नागरिकांचा हा जीवघेणा संघर्ष थांबवावा, अशी मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!