पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रो दर ६ मिनिटांनी धावणार, ‘एवढ्या’ फेऱ्या वाढणार..

पुणे : गर्दीच्या वेळेत आता पुणे मेट्रोची फेरी दर सहा मिनिटांनी येणार आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे मेट्रोची फेरी दर सहा मिनिटांनी येणार आहे. आतापर्यंत सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ८ या गर्दीच्या वेळेत मेट्रो दर सात मिनिटांनी धावत होती.

मात्र १५ ऑगस्टपासून ही सेवा अधिक जलद होणार असून, दर सहा मिनिटांनी एक मेट्रो उपलब्ध होईल. तर विनागर्दीच्या वेळेत मेट्रो दर दहा मिनिटांनी धावेल. सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून एकूण ४९० फेऱ्या घेत आहेत.
नव्या बदलांमुळे आणखी ६४ फेऱ्यांची भर पडणार असून, एकूण फेऱ्यांची संख्या ५५४ इतकी होईल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रवास अधिक सुलभ होणार आहे. महामेट्रोकडून या बदलासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या आणि सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि गर्दीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही फेऱ्यांची संख्या वाढवली आहे. आता प्रत्येक सहा मिनिटांनी मेट्रो येणार असल्याने प्रवाशांना सोयीस्कर सेवा मिळेल.

जुलै महिन्यात पुण्यातील मेट्रो प्रवासाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महिन्यात दैनंदिन प्रवासी संख्या तब्बल १,९२,००० इतकी होती. ऑगस्ट महिन्यात ही संख्या आणखी वाढली असून, आतापर्यंत सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या 2,13,620 इतकी आहे. या आकड्यांवरून पुणेकरांचा मेट्रो प्रवासावरील विश्वास आणि पसंती सातत्याने वाढत असल्याचे दिसते.