आता हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होणार, पुन्हा मेट्रोझिप बससेवा सुरू करण्याचा निर्णय, जाणून घ्या..

पुणे : हिंजवडीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असताना हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (HIA) ने पुढाकार घेत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.येथील आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा ‘मेट्रोझिप’ ही खासगी बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘मेट्रोझिप’ बससेवा मोठा दिलासा ठरू शकते.

हिंजवडीमध्ये कामाच्या वेळात लाखोंच्या संख्येने कर्मचारी ये-जा करतात. त्यामुळे रोजच्याच वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. 2014 साली ही सेवा पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. आयटी अभियंते आणि कर्मचाऱ्यांसाठीच ही खासगी वाहतूक सेवा होती. अनेक कंपन्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोझिप सेवा सुरू केली होती.
असे असताना मात्र कोविड महामारी आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. कोरोना संपल्यानंतर आता कर्मचारी मोठ्या प्रमाणात ऑफिसमध्ये उपस्थित राहू लागले आहेत. यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीचाही प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर्समध्ये पुणे-हिंजवडी फेज 1 ते फेज 3 मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते.

यामुळे अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून वेळ देखील जात आहे. त्यावर उपाय म्हणून एचआयएने पुन्हा एकदा मेट्रोझिप सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव MIDC आणि RTO कडे सादर केला आहे. लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून, मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच सेवा सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, यामुळे हजारो कर्मचारी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, वाढलेला प्रवासाचा खर्च आणि वेळ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘मेट्रोझिप’ सेवा फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, सध्या पुण्यातील वाहतुक कोंडीवर अनेक उपाय केले जात आहेत.