सर्वात मोठी बातमी! महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय…

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी नवीन प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला हरकत घेत सर्वोच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये २७ टक्के आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील फेटाळण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी समाजाला त्याचा मोठा राजकीय फायदा मिळणार आहे. यामुळे निवडणूक देखील लवकरच लागतील.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजीच्या आदेशानुसार 27 टक्के आरक्षण निवडणुकांमध्ये राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच 11 मार्च 2022 च्या प्रभागरचनेनुसार निवडणुका होणार नाही. नव्या प्रभागरचनेनुसार निवडणुका पार पडतील, असेही कोर्टाच्या निकालामुळे आता पुढे आले आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.