कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्याचे नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

इंदापूर : विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांच्याजागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी कृषीखाते गमावले आहे. मात्र, त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.नवीन कृषीमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षनेते यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी दिली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीखाते मिळणं, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते, असं ते म्हणाले.

कर्जमाफीबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, अजून मी कृषी खात्याचा चार्ज घेतलेला नाही. संपूर्ण माहिती घेतल्यावरच यावर बोलणं उचित ठरेल. कर्जमाफीचा जो विषय असेल, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार निर्णय घेतील, असं त्यांनी म्हंटले आहे.

शेतकऱ्यांसाठी आपण काय करू इच्छिता, याबाबत विचारल्यावर दत्तात्रय भरणे म्हणाले, या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, नवकल्पनांचा अवलंब करणं हे माझं मुख्य उद्दिष्ट असेल. पदभार घेतल्यावर समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करेन. असे ते म्हणाले आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना कृषी मंत्री म्हणून त्यांचं भविष्यातील रोडमॅप काय असेल, यावर त्यांनी सांगितलं की, मी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. संपूर्ण माहिती घेतल्यावरच तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींवर उपाययोजना जाहीर करेन. माझ्या शेतकरी बांधवासाठी जे काही शक्य असेल, ते करेन. असे ते म्हणाले आहे.