नागरिकांनो काळजी घ्या! महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी….

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि हवामान विभागाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. आजही अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अनुभव येऊ शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे सातारा व पुणे घाटमाथ्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून तेथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

घाटमाथ्यावरून पाणी खाली उतरल्यास नद्या आणि नाले भरून वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असले तरी विदर्भात मात्र पावसाची स्थिती कायम आहे.

संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. यवतमाळ, नागपूर, अकोला, चंद्रपूर अशा प्रमुख जिल्ह्यांत पावसाचा जोर दिसून येत आहे. त्यामुळे शेतीसाठी ही परिस्थिती फायदेशीर असली तरी अतिपावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्राला आज ‘ग्रीन अलर्ट’ देण्यात आला आहे, म्हणजेच त्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता फारशी नाही.
मुंबईसाठी हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस तर किमान तापमान २६ अंश सेल्सियसच्या आसपास राहील.