पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार ; उपमुख्यमंत्री अजित पवाराचं मंत्री गडकरींना पत्र,केली ‘ही’ मागणी

पुणे : पुणे शहरातील वाहतुकीची समस्या हा मोठा गंभीर विषय आहे पुण्यातील रस्ते आणि वाहनांची संख्या यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. आता पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेतली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या तीन रस्त्याचे रूंदीकरण करण्याचा प्लॅन अजित पवार यांनी गडकरींना सांगितला आहे. पुणे आणि परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या ४ लेन असलेला हा रस्ता ६ लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान ४ लेन रस्त्याचे ६ लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या २ लेन असलेला मार्ग ४ लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
या मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे.अशा परिस्थितीत या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे,जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिवेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी ही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुणेकरांचीं आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
