प्रवाशांनो लक्ष द्या! १ ऑगस्टपासून एसटी प्रवासात मोठा बदल; ‘या’ कार्डशिवाय मिळणार नाही सवलत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देताना सांगितले की, एसटी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सवलतींचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली जात आहे.
राज्यात आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर कार्ड कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कार्ड वितरणासाठी राज्यभरात 4 हजारांहून अधिक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे सेवा मिळावी यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्ड वितरण प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून आवश्यक असल्यास त्यांचे परवानेही रद्द केले जातील.
एसटी महामंडळाच्या मते, स्मार्ट कार्डमुळे तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक वेगवान होईल, सवलतींची पडताळणी सहज होईल आणि प्रवाशांचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होईल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते सक्रिय करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.