पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर, जाणून घ्या…

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता अद्यापही जाहीर झालेला नाही. जून महिन्यात वितरित होण्याची अपेक्षा असलेल्या या हप्त्याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जुलै महिनाही संपत आला असताना, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये या विलंबामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तसेच २० वा हप्ता कधी आणि कशा प्रकारे वितरित होणार याकडे देशातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१९ पासून सुरु झालेल्या PM-Kisan योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.69 लाख कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

योजना सुरु झाल्यापासून प्रत्येक वर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी ₹२,००० चे वाटप केले जाते. शेवटचा, म्हणजे १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरित करण्यात आला होता, ज्यामध्ये १० कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना २३,००० कोटी रुपयांचा लाभ मिळाला.

जूनमध्ये मिळणं अपेक्षित असलेला २० वा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही. कृषी मंत्रालयाने ‘लवकरच हप्ता मिळेल’ असं सांगितलं असलं, तरी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक राज्यांमध्ये खरीप हंगाम सुरू असून, शेतीसाठी भांडवलाची नितांत गरज असलेला काळ आहे.
PM-Kisan योजनेअंतर्गत लहान व सीमांत शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो. आयकर भरदारी नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, तसेच काही विशिष्ट उत्पन्न गटातील लोक या योजनेपासून वगळलेले आहेत. या निर्णयामागे उद्देश हाच की खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांपर्यंतच सरकारी मदत पोहोचावी.
दरम्यान, २० वा हप्ता जाहीर न झाल्यामुळे संपूर्ण देशभरातील लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र, कृषी मंत्रालय आणि PM-Kisan पोर्टलवरील अद्ययावत माहितीचा विचार करता, हप्ता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरित केला जाण्याची शक्यता आहे. तांत्रिक पडताळणी, लाभार्थी सूचीचे अद्ययावत तपशील आणि आधार लिंकिंग प्रक्रियेमुळेही वेळ लागू शकतो.