मोठी बातमी! बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातून उज्वल निकम बाहेर पडणार? काय आहे कारण?

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातुन संताप व्यक्त केला जात होता. या हत्याप्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली.यावेळी न्यायालयाने आरोपींचे दोष मुक्तीचे अर्ज फेटाळलेले आहेत. ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले असताना आता निकम यापुढे केस लढणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेष्ठ वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. आता खासदार म्हणून त्यांना या खटल्यात बाजू मांडता येईल का असा सवाल देखील निर्माण झाला आहे. खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर देशमुख कुटुंबियांकडून या खटल्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे आपणच या खटल्यात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. यावर उज्वल निकम म्हणाले की, माझ्या इतकेच माझे सहकारी बाळासाहेब कोल्हे हे देखील सक्षम असल्याने या खटल्याच पुढे काय होईल याबद्दल आपण निश्चित राहावं. खटल्याची सुनावणी तातडीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्यामुळे खटल्याच्या 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढच्या सुनावणीला उज्वल निकम उपस्थित राहणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याने संतोष देशमुख खून प्रकरणातून मला दोषमुक्त करावे, असा अर्ज दिला होता, तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे, अशा तऱ्हेचा अर्ज दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत..आरोपी वाल्मीक कराड याच्यासह इतर साथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली बारा ते तेरा आरोप ठेवण्यात यावेत, निश्चित करावेत. अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केला आहे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
