पुण्यातील ‘या’ धरणाच्या पाण्याला चढला हिरवा रंग ; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुणे : पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. धरणातील पाण्यावर सकाळच्या सुमारास हिरवा रंग चढतो आणि दुपारी तो उतरतो. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणाच्या उत्तरेकडील बाजूस तसेच संगमनेर, माळवाडी आणि नऱ्हे गावांच्या किनाऱ्यावर पाण्याचा रंग बदलल्याचे निदर्शनास येत आहे. या जलाशयातून भोर शहरासह परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत, शेतीच्या वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो,अशी चिंता स्थानिकांनी नागरिकांनी व्यक्त केली आहे.तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी आवश्यक उपाय तातडीने राबवण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाणी सुरक्षित असल्याचे निष्पन्न होईपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात केले आहे.
