शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला! वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, नागपुर येथील घटनेने हळहळ…

नागपूर : शेतात दिवसभर काम करून थकलेल्या महिलांपैकी काही जणी जेवायला बसल्या, आणि अचानक वीज कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथे घडली.

मंगलाबाई जीवन मोटघरे (रा. परसोडा, ता. रामटेक) आणि वर्षा देवचंद्र हिंगे (रा. भोजापूर, ता. रामटेक) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तसेच पाच महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत. त्यामध्ये जयश्री आकाश जवादे, रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर (सर्व रा. रामाळेश्वर वॉर्ड, रामटेक), तसेच कलाबाई कवडू वरघणे आणि प्रमिला वासुदेव आष्टनकर (दोघीही रा. भोजापूर, ता. रामटेक) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात सुमारे २५ महिला शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास काम थांबवून जेवणासाठी बसल्या असताना अचानक वीज कोसळली. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला.

तसेच या घटनेत पाच महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. रामटेकजवळच्या सोनेघाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने ही घटना घडली. यात या दोघींचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी परिसरात पावसाचं वातावरण होतं, मात्र वीज कोसळेल असा कोणताही इशारा नव्हता. अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पावसाच्या आधीच वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.