महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा!! तुकडाबंदी कायद्यात अनेक मोठे बदल, जाणून घ्या महत्वाची माहिती….

मुंबई : राज्यातील ५ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. राज्यात आता जमिनीच्या तुकड्यांवर मर्यादा घालणाऱ्या तुकडाबंदी कायद्यात मोठा बदल करण्यात आला असून, नव्या सुधारणांचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुकास्तरावर विकसित झालेल्या निवासी क्षेत्रांमध्ये तुकडाबंदी कायदा लागू राहणार नाही.

ज्या जमिनींना अधिकृत निवासी मान्यता आहे, तिथे आता छोटे तुकडे खरेदी-विक्रीसाठी कायदेशीररीत्या वैध ठरतील. अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनाआधीच यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १५ दिवसांत सविस्तर नियमावली तयार करून कायद्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल.
या बदलांमुळे १ हजार चौरस फूटांपर्यंतच्या भूखंडांवरील अडचणी दूर होणार आहेत. अनेक नागरिकांना या लहान भूखंडांवर व्यवहार करताना कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. आता त्यांना अधिकृत मान्यता मिळणार आहे. तसेच बांधकाम किंवा खरेदी-विक्रीसाठी सहजता निर्माण होणार आहे. महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रांतील जमिनींना तुकडाबंदी कायद्यातून वगळण्यात आले आहे.

यामुळे आता शहरी भागात एक-दोन गुंठे किंवा त्याहून लहान भूखंड कायदेशीररीत्या खरेदी करता येणार आहेत आणि त्यावर मालकी हक्क मिळणार आहे.यामुळे शहरी भूखंड व्यवहार अधिक सुलभ होणार असून, गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर निवासी क्षेत्राचा नियोजित विकासही गती घेईल. यामुळे हे फायदेशीर आहे.
दरम्यान, आता राज्यातील तुकडाबंदी कायद्याच्या बदलामुळे अनेक वर्षांपासून अडकलेले भूखंड व्यवहार आता खुले होणार असून, विशेषतः लहान प्लॉट्स धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नियमावली लवकरच जाहीर होणार असून, व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि गतिशीलता वाढणार आहे. यामुळे याबाबत अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती.