राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर राज्यात वाढला असून आजही हवामान खात्याने (अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच या काळात मुंबईकरांनी अनावश्यक प्रवास टाळावा, समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईचे कमाल तापमान २७ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहणार आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. या भागात भूस्खलनाचा धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात ‘ग्रीन अलर्ट’ देण्यात आला असून, पावसाचा जोर लवकरच ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.