गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! एसटीचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती..

पुणे : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो.

आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतूकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते.

दरम्यान, यंदा सुमारे ५००० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक प्रवाश्यांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे गणपती उत्सवासाठी देखील एसटीने तब्बल ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.
२२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात महिला व ज्येष्ठांना सवलत जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलै पासून सुरु होत आहे.