धक्कादायक! किरकोळ तरुणाचा खून, कात्रज भागातील घटनेने खळबळ…


पुणे : दिवसागणिक गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला.

ही घटना शुक्रवारी (दि.11) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कात्रज येथील साई सिद्धी चौक आंबेगाव पठार परिसरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. आर्यन साळवे (वय 25, रा. सटाणा, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर धैर्यशील उर्फ सचिन मोरे (वय 30, रा. साई सिद्धी चौक) याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहिती नुसार, आर्यन साळवे हा मूळचा नाशिकमधील सटाण्यातील आहे. त्याचे मामा धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. पंधरा दिवसांपूर्वी तो मामाकडे राहण्यासाठी आला होता. तो एका सलूनच्या दुकानात काम करत होता. शुक्रवारी रात्री तो साडेदहाच्या सुमारास साई सिद्धी चौकातील एका पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपी धैर्यशील मोरे पानपट्टीवर सिगारेट ओढत होता.

धैर्यशीलने आर्यनकडे पाहिले, या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच आर्यनने त्याच्या कानशिलात लगावली होती. त्याच कारणातून धैर्यशील हा घरी जाऊन कोयता घेऊन आला. आर्यन हा दुकानाच्या पायरीवर बसला होता. धैर्यशील याने पाठीमागून येऊन आर्यनच्या डोक्यात कोयत्याने आर्यनवर वार केले.

दरम्यान, घाव वर्मी लागल्यामुळे आर्यन गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली. पोलिसांनी धैर्यशीलला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!