धक्कादायक! जमिनीच्या वादातून 100 हून अधिकांची हत्या, गोळ्या झाडल्या, जिवंत पेटवलं, घटनेने देश हादरला..


जमिनीच्या वादातून १०० पेक्षा अधिक जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नायजेरियातील बेन्यू राज्यातील येलेवाटा गावात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि अनेकांना जिवंत पेटवून दिलं. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी अनेकांना त्यांच्या कुटुंबासह जिवंत पेटवून दिलं. जिवंत जाळण्याआधी त्यांना बेडरुममधून कोंडण्यात आलं.

मृतदेहांची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्यांची ओळख पटणंही अवघड आहे. बेन्यू राज्य नायजेरियाच्या मध्य भागात आहे. या भागात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे. जमिनीच्या वापरावरुन इथे तणावपूर्ण स्थिती कायम असते. एका बाजूला गुराखी आहेत. ते पशुपालनासाठी जमिनींचा वापर करतात.

दुसऱ्या बाजूला शेतकरी जमिनींचा वापर शेतीसाठी करतात. या दोन्ही बाजूंमध्ये सातत्यानं वाद होतात. त्याला धार्मिक, जातीय किनार आहे. यामुळे अनेकदा हिंसाचार होतो. बेन्यू राज्यातील हल्ल्यांची संख्या, त्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. बंदूकधाऱ्यांना कोणाचाच धाक उरलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.

पीडितांमधील बहुतांश जण शेतकरी आहेत. त्यामुळे या भागात कृषी संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे,’ अशी माहिती ऍमेनेस्टी इंटरनॅशनलनं दिली आहे. गेल्या महिन्यात ग्वेर वेस्ट जिल्ह्यात किमान ४२ गुराख्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रिसर्च फर्म एसबीएम इंटेलिजन्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये या संघर्षांमध्ये ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

याठिकाणी २२ लाखांपेक्षा जास्त जणांनी त्यांचं घरदार सोडलं आहे. त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधादेखील मिळत नसल्याची माहिती आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. त्या दाव्यात किती तथ्य आहे, हे या घटनेतून स्पष्ट होतं. अनेक जण आताही बेपत्ता आहेत. जखमींचा आकडाही जास्त आहे.

दरम्यान, त्यांना अद्याप पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अनेक कुटुंबांना त्यांच्या बेडरुममध्ये बंद करुन जाळण्यात आलं. मृतदेह जास्त जळाले असल्यानं त्यांची ओळख पटणं जवळपास अशक्य आहे, अशी माहिती ऍमेनेस्टी इंटरनॅशनलनं सोशल मीडियावर दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!