कुंडमळा पूल दुर्घटनेमागचं धक्कादायक कारण आलं समोर, स्थानिक नागरिकानी सांगितला सगळा घटनाक्रम…

पुणे : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० हून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत.

पूल कोसळल्यावर राज्यातील बचाव पथक, पोलीस आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे बचावकार्य सुरू केले. आता या घटनेमागचे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवासी गणेश पवार यांनी पूल कोसळण्यामागचे खरे कारण उघड केले आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील कुंडमळा भागातील या लोखंडी पुलावर पर्यटकांची गर्दी आणि एकावेळी दुचाकींची दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त भार वाढल्याने पूल कोसळला, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.

गणेश पवार यांनी सांगितले, पूल छोटा असून एका वेळी एकच दुचाकी जाऊ शकते. मात्र त्या दिवशी दोन्ही बाजूंनी दुचाकी आल्याने वाद झाला. पर्यटक मोठ्या संख्येने पुलावरच थांबले होते. पूल हलू लागला आणि काही सेकंदात कोसळला.” पवार यावेळी घटनास्थळीच उपस्थित होते.

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वतः पूल कोसळताना अनुभवला असून, लोखंडी पट्टी पकडून आपला जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी आणखी ३-४ पर्यटकांना बाहेर काढले.
शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या पुलावर नियंत्रणाची गरज होती. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी याठिकाणी पर्यटकांसाठी बंदी लागू केली होती, तरीही ती पाळली गेली नाही, हे या घटनेतून स्पष्ट होते.