आधी पतीला कुऱ्हाडीने वार करून संपवलं! नंतर पत्नीने मृतदेहाचे तुकडे करून शोषखड्ड्यात टाकले; तब्बल दोन महिन्यांनी नाशिकमधील भयंकर कृत्याचा उलगडा..


नाशिक : नाशिकमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे एका पत्नीने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. इतकेच नाही, तर तिने त्याचे तुकडे करून ते घरातच पुरले. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

यशवंत मोहन ठाकरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याच्या पत्नीचे नाव प्रभा यशवंत ठाकरे असून, तीच या हत्येची आरोपी आहे. पोलिसांनी प्रभाला अटक केली असून, चौकशीत तिने आपली गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ही थरकाप उडवणारी घटना सुरगाणा तालुक्यातील मलगोंडा (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे उघडकीस आली आहे. यशवंत ठाकरे हे गेल्या १४ एप्रिल २०२५ पासून अचानक बेपत्ता झाले होते. दोन महिने उलटूनही ते घरी न परतल्याने त्यांच्या वृद्ध आई-वडिलांनी त्यांच्या पत्नी प्रभा यांच्याकडे विचारणा केली.

यावेळी प्रभाने “ते गुजरातमधील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेले आहेत” असे उत्तर दिले. मात्र, पावसाळा सुरू होऊनही मुलगा घरी परतला नसल्याने त्यांच्या पालकांची चिंता वाढली. त्यांनी पुन्हा एकदा प्रभाकडे विचारपूस केली, परंतु प्रभा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय अधिकच गडद होत गेला. काही दिवसांनी यशवंतच्या कुटुंबीयांनी घराची ओसरी लक्षपूर्वक पाहिली. त्याठिकाणी शेण व मातीने सारवलेला खड्डा दिसून आला.

त्यामुळे संशय अधिकच वाढला आणि कुटुंबीयांनी थेट पोलिसांकडे प्रभा ठाकरेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रभाला गुजरातमधील बिलीमोरा येथून ताब्यात घेऊन सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. महसूल विभागासोबत संयुक्त पंचनामा करून पोलिसांनी घरातील ओसरीवर खणून पाहिले, मात्र तिथे मृतदेह सापडला नाही. प्रभाने त्यावेळी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते आणि “मी काही केलं नाही” असे वारंवार सांगत होती.

दरम्यान, या घटनेला एक नवा वळण त्यावेळी मिळाला, जेव्हा यशवंतचा लहान भाऊ उत्तम याची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी तिला दारात पडलेली यशवंतची चप्पल दिसली. प्रभाने ती चप्पल लपवण्याचा प्रयत्न केला. यावरून मेथूला संशय आला आणि तिने हा प्रकार तिच्या पती उत्तमला सांगितला. उत्तमने पुढील तपास घेतला आणि यशवंतच्या घराच्या मागे असलेल्या पडक्या शौचालयाच्या शोषखड्ड्याजवळ कुजलेल्या वासाची तीव्रता जाणवू लागली.

त्याठिकाणी माशाही घोंगावत असल्याचे दिसून आले. त्याने त्वरित त्या ठिकाणी खोदकाम सुरू केले. काही वेळातच त्याला एका गोणीतील मृतदेहाचे अवशेष आढळले आणि जमीनच हादरली. त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खड्डा खोलून पाहिला. तेथे मृत यशवंतचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

पोलिसांनी प्रभा ठाकरे हिला पुन्हा ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, तिने शेवटी आपली कबुली दिली. तिने सांगितले की, मीच कुऱ्हाडीने वार करून यशवंतची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे केले आणि गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात फेकले. मृतदेह कुजून वास येऊ नये म्हणून औषधेही टाकली.

दरम्यान, पोलिसांनी सदर प्रकरणात प्रभा ठाकरे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला असून, तिच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हत्या नेमकी कशामुळे झाली, हे अद्यापही स्पष्ट झालं नसून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून, सामाजिक व कौटुंबिक संबंधांमधील बिघाड आणि हिंसेच्या वाढत्या घटना किती गंभीर रूप घेत आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!