हडपसर ते यवत उन्नत मार्गाचे टेंडर पुढील तीन महिन्यात होणार पूर्ण! शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सहापदरीकरणास भूसंपादन होणार – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेंचा विश्वास

उरुळीकांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवतपर्यंतचा महामार्ग सहापदरीकरणासह इलिव्हेटेड उड्डानपूल उन्नत महामार्गाच्या धर्तीवर विकसित होणार असून पुढील तीन महिन्यांत एमएसआरडीसी कडून या प्रकल्पाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार असून स्थानिक शेतकऱ्यांना भूसंपादनात मोबदला देऊन जलद गतीने उन्नत महामार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिले आहे.

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते उरुळीकांचन दरम्यान वाहतुककोंडीच्या समस्येवर तसेच पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरीलकोंडी होणाऱ्या प्रत्येक स्थळांची पाहणी केली. त्यानंतर कुंजीरवाडी (ता.हवेली ) येथे पोलिस, महापालिका, पीएमआरडीए, महसूल अशा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतुक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजनांची चर्चा केली.त्यानंतर उपाययोजनांवर कारवाई करण्याचा सूचना संबंधीत प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी बैठकीत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हडपसर ते यवत
उन्नत मार्गांचा कामाविषयी भाष्य केले आहे. बैठकीस हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे , अप्पर लोणीकाळभोर तहसिलदार तृप्ती कोलते,पीएमआरडीएचे सहाय्यक आयुक्त मोरे, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस , पोलिस निरीक्षक शंकर पाटील, राजेंद्र पन्हाळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, नंदू पाटील काळभोर, सचिन तुपे, गुलाब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, हवेली तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने तालुक्यातील अनेक वर्षांच्या जटील समस्या सोडविण्यासाठी माझे पहिले प्राधान्य आहे. शहरीकरण वाढताना अरूंद रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विजेची समस्या दूर करण्यासाठी माझे मागील सहा महिन्यांत बैठकाहोऊन समस्यांवर काम सुरू आहे.पीएमआरडीकडून तालुक्यात ७०० कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुणे-अहिल्यानगर तसेच पुणे -सोलापूर महामार्गावर गावांना जोडणारे अरूंद रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे. चाकण शिक्रापूर मार्ग सहापदरीकरण तर हडपसर ते यवत मार्ग व वाघोली ते शिरुर मार्ग उन्नत मार्गाच्या धर्तीवर विकसित होत आहे. त्यामुळे पुढील काळात वाहतुक कोंडीचा भार हलका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान बैठकीत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी कवडीपाट ते उरुळीकांचन वाहतुक कोंडी सुधारण्यासाठीपोलीस, सार्वजनिक बांधकाम, पीएमआरडीए अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.चालू स्थितीत महामार्गाची दुरुस्तीसह आवश्यक ठिकाणी अंडरपास तसेच पोलिस कर्मचारी संख्या वाढविण्याची सूचना दिल्या आहेत.