काळजी घ्या! कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, महाराष्ट्रात ‘इतके’ रुग्ण सापडले…

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे देशातील एकूण ११ राज्यांमध्ये संसर्गाची नोंद झाली असून, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू याठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार २० मे २०२५ पर्यंत देशात २५७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये १६४ नवीन रुग्ण आहेत. सध्या केरळमध्ये ९५ सक्रिय रुग्ण, तामिळनाडूमध्ये ६६ आणि महाराष्ट्रात ५६ सक्रिय रुग्ण आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात ४४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरी भागांमध्ये प्रशासन सज्ज झालं आहे

दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या नवीन स्ट्रेनचा संसर्गदर पूर्वीच्या म्युटेशनइतका वेगवान नसू शकतो, मात्र ज्यांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो. नुकतेच मुंबईतील KEM रुग्णालयात दोन मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये एक कर्करोगाने ग्रस्त 59 वर्षीय पुरुष आणि दुसरी १४ वर्षांची मुलगी होती, जी इतर आजारांनी पीडित होती.
गुजरात, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, पुद्दुचेरी, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्येही कमी प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १२ मेपासून देशातील कोरोनाच्या आकडेवारीचं नियमित अद्ययावतकरण सुरू केलं आहे.
सध्याच्या परिस्थितीत जनतेने खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी टाळणे, वेळोवेळी हात धुणे आणि नाक, डोळे, तोंडाला हात लावणं टाळणं हे उपाय अवलंबावेत. लक्षणं आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.