पुरंदर विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, विमानतळाचा प्रश्न….

पुरंदर : गेल्या काही दिवसांपासून पुरंदर विमानतळाबाबत वाद निर्माण झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सांगितले की, शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे, अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये चर्चेतून मार्ग काढायचा असतो, जमिनी आणि घरे संपादित होत आहेत.

काहींचा विरोध आहे, मात्र या सात गावांमधील सुमारे 60% जमीन अन्य लोकांनी खरेदी केली आहे. मधल्या काळात काही जमीन मालक जमीन देण्यास तयार झाले होते. ते जर जमीन द्यायला तयार असतील तर ही 60% जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, अशांच्या जमिनी संपादित करून, प्रकल्प मार्गी लावू.
दरम्यान, पुरंदर येथील विमानतळाला होत असलेला विरोध लक्षात घेता, सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज देऊ केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी जमिनी विकल्या आहेत. अशा जमिनी देण्यास संबंधित मालक तयार आहेत. काहींचा विरोध आहे.

या जमिनी ताब्यात घेण्याचे काम संबंधित अधिकारी करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून पुरंदर विमानतळबाधिताचा विरोध न जुमानता हा प्रकल्प होणारच, असे संकेतच पवार यांनी दिले आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पुरंदर येथील विमानतळासाठी सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून जमिनीच्या मोजणीपूर्वी करण्यात येणारे ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या विरोधामुळे थांबवण्यात आले. या आंदोलनावेळी दगडफेक, तसेच लाठीचार्ज करण्यात आला होता.